आपलं माणूस भेटणं यात एक वेगळाच आनंद असतो. त्यात हि तो मुंबई महानगरीच्या गर्दी मध्ये न शोधता सापडणं... नाही ओळखीचा नाही म्हणायचं मला... ओळखीचा अन आपलं माणूस यात खूप फरक आहे.
ओळखीचा माणूस हा फक्त आपला चेहरा ओळखतो. चेहऱ्याच्या मागच्या भावना, विचार त्याला अबोध असतात. आपल्या या बाजूचा त्याने कधी मागोवा घेतलेला नसतो किंवा प्रयत्नहि केलेला नसतो.
आपलं माणूस हे सगळं अगदी सहज करतो. तोच पुढे केलेला हात, तीच भेटण्याची जुनी पद्धत अन चेहर्यावरचं तेच ओळखीचं स्मित. नुसता स्मित नसता ते, तर ते आपल्या बद्दल च्या सुखद आठवणी, केलेल्या गमती-जमती, घडलेले किस्से या सर्वांमधून फुललेला असा ते हास्य असतं. त्याला नेमकी आठवत असते ती आपल्या बरोबर झालेली शेवटची भेट, अन तेव्हा शेअर केलेल्या गोष्टी, ज्याबद्दल तो विचारायचं विसरत नाही. आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतो अन गरज असेल तर ओरडतो सुद्धा. त्याने काय केला तर आपल्याला बरं वाटेल हे हि त्याला ठाऊक असतं. पण हे सगळा कृत्रिम नसतं हं, अगदी सहज.
अनोळखी अन ओळखीचे सारे एका बाजूला अन आपलं माणूस एका बाजूला, एक वेगळाच समाधान देऊन जातं. जुन्या आठवणी जागवून जातं, दुखरे कोपरे दुमडून जातं अन हळव्या जखमांवर फुंकर मारून जातं. आपलं या जगात कोणी तरी आहे असा एक आधार देऊन जातं.
वैशाख ऋतूत वक हलकी श्रावणी सर देऊन जातं, रणरणत्या उन्हात थंड झुळूक देऊन जातं. आयुष्य एका नवीन उमेदीने लिहिण्यासाठी नवीन कागद देऊन जातं. अचानक का होईना पण भेट झाली म्हणजे परत भेट नक्की होईल असा आशावाद सुद्धा देऊन जातं.
आपलं माणूस सुखावून जातं.
Sunday, June 5, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment